April 26, 2019

डोंबिवली दुर्घटना: धोक्याची घंटा?

डोंबिवली एम आय डी सी परिसरात केमिकल व्यवसायाशी निगडित होणा-या सततच्या दुर्घटना धोक्याची घंटा वाजवत आहेत, मात्र त्या ऐकण्यासाठी डोंबिवलीकर नागरिक जागे आहेत का, हा एक प्रश्नच आहे? थोडे मागे गेलो तर आपल्याला लक्षात येईल की या परिसरात अशा दुर्घटना सातत्याने घडतच आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच, म्हणजे ५ मार्च २०१६ रोजी, येथीलच अल्ट्रा प्युर केमिकल कंपनी मध्ये भीषण आग लागली होती, ज्यात १२ कामगार थोडक्यात बचावले होते. (संदर्भ: हिंदुस्तान टाईम्स वृत्त: http://goo.gl/HNJBI5).

१४ मे २०१४ रोजी केमस्टार कंपनीच्या डिस्टिलेशन युनिटला आग लागून एका कामगाराचा जळून मृत्यू झाला होता तर तिघे जण जखमी झाले होते. (संदर्भ: डी एन ए वृत्तपत्र http://goo.gl/RrIIW9)

७ डिसेंबर, २०१३ रोजी, कल्याण शिळ रस्त्यावरील गायकर कम्पाउण्ड मध्ये एक जुन्या केमिकल बॉयलर मध्ये स्फोट होऊन आसपासची घरे प्रभावित झाली होती व तीन कामगारांचा मृत्यू व दोघे जण जखमी झाले होते. (संदर्भ: झी २४ तास वृत्त: https://goo.gl/9veLjj व डी एन ए: http://goo.gl/RrIIW9)

३१ ऑक्टो, २०१२ रोजी नार्को केमिकल कंपनी या रंग बनवणाऱ्या कंपनीला रात्री एक च्या सुमारास भीषण आग लागली होती, व जी विझवण्यासाठी ४० बंब बोलवावे लागले होते. दैव योगाने कोणतीही जीवित हानी यात झाली नव्हती. (संदर्भ: टाईम्स ऑफ इंडिया: http://goo.gl/akdZwt ).

त्यानंतर आज २६ मे २०१६ रोजी पुन्हा एका केमिकल कंपनी मध्ये मोठा स्फोट झाल्याने व जीवितहानी झाल्याने, या रहिवासी परिसराशी लागून असलेल्या एकमेव एम आय डी सी मध्ये चांगल्या दर्जाची सुरक्षा व आपत्कालीन सज्जता ठेवली जाते की नाही हा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

तसेच _केमिकल कंपनीशी संबंधित व्यवस्थापन फक्त नफा कमवण्यासाठीच व्यवसाय करतात की कामगार, रहिवासी यांच्या जीविताची व पर्यावरणाची सुद्धा त्यांना काळजी आहे, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे_. डोंबिवली एम आय डी सी तील सर्व केमिकल कंपनी व त्यातील यंत्रणांचा दर्जा इतका वाईट आहे का की ज्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, याची खातरजमा कोण करणार आहे?

याच डोंबिवली परिसरात दोन वर्षांपूर्वी झालेला *हिरवा पाउस* (२३ जानेवारी २०१४) (संदर्भ: टाईम्स ऑफ इंडिया: http://goo.gl/aG1fFr) व २०११ साली सी पी सी बी ने केलेल्या सर्वे मध्ये डोंबिवली देशातील *दहाव्या क्रमांकाची सर्वात जास्त प्रदूषित औद्योगिक वसाहत* म्हणुन गणली गेली होती. (संदर्भ: इंडियन एक्स्प्रेस: http://goo.gl/q5bO2S )

केमिकल उद्योगाशी संबंधित व डोंबिवली बाहेर राहणारे मालक व त्यांचे व्यवस्थापक यांची डोंबिवली बाबत अशी एक भावना झालेय का की हे एक निरुपद्रवी लोकांचे शहर आहे की जिथे कोणत्याहि सुरक्षेची काळजी न घेता त्यांचा नफा वाढवण्याचा व्यवसाय अव्याहत पणे चालू शकतो? ज्यात नागरिकांचे अथवा कामगारांचे जीवित धोक्यात घातले जाऊ शकते? तसेच एम आय डी सी चे / उद्योग विभागाचे अधिकारी कोणत्या सुरक्षा तपासण्या करतात व त्यांचे निकाल काय असतात?

या दुर्घटनेच्या निमित्ताने नागरिकांनी हे सर्व गांभीर्याने घेतले नाही तर भविष्यात नको असलेल्या परिस्थितीशी सामना कसा करावा लागू शकतो याची एक छोटीशी चाहूल आज दुर्दैवाने मिळालीच आहे.
भविष्यात डोंबिवली सुरक्षित रहायची असेल तर येथील *सर्व टेक्स्टाईल व केमिकल कंपनींचे सुरक्षा ऑडीट* करण्याची मागणी नागरिक आता तरी करणार आहेत का? आज झालेल्या भीषण स्फोटाची व्याप्ती पाहता, डोंबिवली कर सुरक्षित राणार नसतील तर केमिकल कंपनीना अथवा या रहिवासी परिसरात गुंतलेल्या एम आय डी सी लाच अन्यत्र दूर हलवणार का? जर रहिवासी सुरक्षित नसतील तर सांस्कृतिक व सुशिक्षितांची नगरी म्हणवण-या डोंबिवलीच्या भविष्याची व्हिजन तरी कशी सुरक्षित राहील, याचा विचार कोणी करणार आहे का?

कोणाची इच्छा नाहिये पण दुर्दैवाने उद्या एखादी भोपाळ सारखी दुर्घटना होणारच नाही याची हमी एम आय डी सी चे अधिकारी, सुरक्षा व आपत्कालीन यंत्रणा, कारखान्यांचे मालक व व्यवस्थापन येथे राहात असलेल्या सर्व जनतेला देणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्यांची उत्तरे नागरिकांनी मिळवलीच पाहिजेत. हा आजच्या दुर्घटनेचा संदेश आहे, पण तो कोण वाचणार?

 

केतन बोंद्रे
*एक त्रस्त डोंबिवलीकर नागरिक*

© ketanbondre@gmail.com

 

“Disclaimer: The opinions expressed within this article are the personal opinions of the author. NewsNViews. Online takes no responsibility on accuracy, completeness, suitability, or validity of any information on this article. All information is provided on an as-is basis. The information, facts or opinions appearing in the article do not reflect the views of NewsNViews.Online and it does not assume any responsibility or liability for the same.”

About Guest Authors 354 Articles
News n Views is an online place for nationalists to share their opinions, information and content by way of Blogs, Videos, Statistics, or any other legal way that they feel comfortable.