April 19, 2019

वृक्षांशिवाय माणसाला काही ही भविष्य नाही-

वृक्षांशिवाय माणसाला काही ही भविष्य नाही- राज्यपाल
सी. विद्यासागर राव
================================================
FMवृक्ष लावण्यापेक्षा वृक्ष जगवण्याचे काम आव्हानात्मक असून वृक्षांशिवाय माणसाला काहीही भविष्य नसल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
वनमहोत्सवाच्या निमित्ताने आज वन विभागातर्फे राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावले जात आहेत. त्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज माहिम येथील निसर्ग उद्यानात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वन मंत्री प्रकाश जावडेकर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार वर्षा गायकवाड, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, श्रीमती सपना सुधीर मुनगंटीवार, अभिनेता विवेक ओबेरॉय, वन विभागाचे सचिव विकास खारगे, आदी मान्यवरांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, १५०० शालेय विद्यार्थी, सामाजिक-स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वृक्ष जगले तर आपण आपली भावी पिढी जगू शकेल हे लक्षात घेऊन सर्वांनी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करून श्री. राव म्हणाले की, विद्यापीठांचा कुलपती म्हणून आपण सर्व विद्यापीठांना त्यांच्या परिसरात वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी वन विभागाने विद्यापीठांना उत्तम रोपं उपलब्ध करून द्यावीत. पर्यावरण रक्षणाबरोबर जलव्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षण व्हावे ही अपेक्षा व्यक्त करतांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी मराठवाड्याच्या प्रत्येक गावात मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड केली जावी अशी सूचना केली.
एक झाडं पडलं तर तिथे दुसरे झाडं लावले गेले पाहिजे असे सांगतांना मुलाचा जन्म असो की वाढदिवस प्रत्येक आठवणींचे जतन हे एक रोप लावून झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य वृक्ष, राज्य प्राणी, राज्य फुल, राज्य फुलपाखरू अशी राज्यांची मानचिन्ह लोकमानसापर्यंत विशेषत: शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्याचे त्यांना ज्ञान व्हावे यासाठी मराठीत एखादा पाठ सुरु करण्यात यावा अशी सूचनाही राज्यपालांनी केली.

निसर्गाकडून खुप घेतले आता परत करण्याची वेळ- मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
==================================================

जलयुक्त महाराष्ट्रासोबत वृक्षयुक्त महाराष्ट्राची संकल्पना यशस्वी होण्यासाठी आजचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे, यातून ही संकल्पना नक्कीच यशस्वी होईल असे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निसर्गाकडून आपण खुप घेतलं आता परत करण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपण निसर्गाकडून आतापर्यंत घेतच राहिलो, ही संपत्ती अक्षय नाही, ती कधी ना कधी संपणारच आहे. आपण पाणी संपवलं, वृक्ष तोडले, आता या सगळ्या नैसर्गिक संपत्तीचं झिरो बॅलन्स होऊ पाहणारं खाते पुन्हा जतन आणि संवर्धनातून पूर्ण भरायचं आहे . त्यासाठी वृक्षमय महाराष्ट्राचं वन विभागाने टाकलेले पाऊल निश्चित अभिनंदनीय आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वन विभागाने “ ट्री क्रेडिट-ग्रीन सर्टिफिकेट” सारखी योजना राबवावी. ज्या व्यक्ती किंवा कॉर्पोरेट हाऊसेस वृक्ष लावू इच्छितात पण त्यांच्याकडे वेळ नाही अशांसाठी वन विभागाने मोबाईल ॲप विकसित करावा व त्याद्वारे पैसे भरून त्यांच्यावतीने वृक्ष लागवडीची यंत्रणा निर्माण करावी. यासाठी राज्यातील पडिक जमीनी बेरोजगार युवकांच्या ताब्यात द्याव्यात असे झाल्यास हरित महाराष्ट्राची संकल्पना यशस्वी करतांना आपण बेराजगार युवकांसाठी यातून वन संवर्धनाचा रोजगार निर्माण करू शकू. माहिम येथील निसर्ग उद्यानात कांदळवन संशोधनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विकास पर्यावनणस्नेही असावा- उद्धव ठाकरे
===========================
ग्लोबल वॉर्मिंग ने आपल्याला वॉर्निंग दिली असून याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी विकास हा पर्यावरणस्नेही असावा असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले ते म्हणाले की, बेभरवशाचे वृक्षारोपण न करता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यापक लोकसहभाग मिळवत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतल्यामुळे तो यशस्वी ठरला आणि त्यास वरूणराजाचा आशीर्वाद ही मिळाला. महाराष्ट्राच्या वातावरणात रुजवणारी आणि जैवविविधतेची साखळी संपन्न करणारी झाडं लावण्यात यावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्राने एक नवी सुरुवात केली- प्रकाश जावडेकर
==================================
एकाच‍ दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करून महाराष्ट्राने एक नवी सुरुवात केली आहे असे केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, झाडं ही ऑक्सीजनची फीक्स डिपॉझिट आहेत हे लक्षात घेऊन झाडं लावण्याची मानसिकता वाढवली पाहिजे. झाडं ही माणसाची अभिमानाने सांगावयाची संपत्ती आहे ती जपली पाहिजे असेही ते म्हणाले. लोकसभेत मंजूर झालेलं कॅम्पा बिल राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात प्रयत्न करण्यात येतील. असे झाल्यास वनीकरणासाठी उपलब्ध असलेले ४२ हजार कोटी रुपये राज्यांमध्ये वितरित करता येतील. चौदाव्या वित्त आयोगाने वनांसाठी वेटेज दिल्याचे सांगून श्री. जावडेकर पुढे म्हणाले की, येत्या तीन वर्षात देशभरात १०० कोटी झाडं लावली जातील. यादिशेने केंद्रीय वन मंत्रालयाने काम सुरु केले असून नगर उद्यान-स्कुल नर्सरी सारखे उपक्रम देखील राबविले जात आहेत.

जलयुक्त्‍ शिवार आणि माहिम निसर्ग उद्यान उत्कृष्ट उदाहरण- राजेंद्र सिंग
=================================================
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी जलयुक्त शिवार प्रमाणे वृक्षयुक्त महाराष्ट्रासाठी वन विभागाने उचललेल्या पाऊलांचे कौतूक केले. जमीनीत पाणी मुरवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरत आहे. त्याप्रमाणे जगातलं पहिलं कचऱ्यावर तयार झालेलं माहिमचं निसर्ग उद्यान ही नैसर्गिक पुनर्विकासाचं एक उत्तम मॉडेल आहे, या दोन्ही गोष्टी जगासमोर आल्या पाहिजेत असे ही ते म्हणाले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वन सचिव विकास खारगे यांनी केले.

कार्यक्रमाची क्षणचित्रे
=============
एकाचवेळी ५ हेक्टरवर ३२०० वृक्षांची लागवड
मान्यवरांसमवेत १५०० शालेय विद्यार्थी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी
मान्यवरांसह उपस्थितांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ
वन विभागाच्या “बिझिनेस ऑफ बायोडायर्व्हसिटी या पुस्तकाचे प्रकाशन
राजवर्धन पाटील या १६ वर्षीय विद्यार्थ्याचे “भारतातील विदेशी वृक्ष”या फोटो पुस्तकाचे प्रकाशन
जव्हार आणि शहापूरसाठी wwf (worldwide fund for nature) आणि न्यू इंडिय इन्शोरंस कंपनी कडून १ लाख रोपट्यांचा धनादेश वन विभागाकडे सुर्पूत
विविध झाडं, फुलं आणि प्राण्यांच्या गणवेशातील शेकडो मुलांनी आणली कार्यक्रमस्थळी रंगत
भर पावसात वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला.
वृक्ष लावगडीनंतर राज्यपालांसमवेत मुख्यमंत्र्यांनी घेतला झाडासोबत सेल्फी
सपना सुधीर मुनगंटीवार व सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला लावलेल्या झाडोसोबत”सेल्फी”
शालेय विद्यार्थ्यांचा लावलेल्या वृक्षासोबत “सेल्फी”

 

Featured Pic courtesy – http://www.aarushdevcon.com/

About Guest Authors 354 Articles
News n Views is an online place for nationalists to share their opinions, information and content by way of Blogs, Videos, Statistics, or any other legal way that they feel comfortable.